पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बीएमसी सफाई कर्मचाऱ्यांसाठी बुरशीजन्य संसर्ग तपासणी शिबिर
”देबाब्रता ऑरो फाऊंडेशन आणि दि एस्थेटिक क्लिनिक्स” चा उपक्रम
मुंबई – पावसाळ्यामध्ये बीएमसी सफाई कर्मचाऱ्यांचा साफसफाईमुळे दररोज दूषित पाणी, घाणीशी संबंध येत असतो. त्यामुळे त्यांना व त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना विविध आजार जडण्याची भीती आहे. सफाई कर्मचारी व त्यांच्या परिवाराच्या आरोग्य रक्षणासाठी देबाब्रता ऑरो फाऊंडेशन आणि दि एस्थेटिक क्लिनिक्स ने एक अनोखा उपक्रम राबवित आरोग्य जनजागृती केली आहे. बांद्रा न्यायालयाजवळील बीएमसी चौकी येथे बुरशीजन्य संसर्ग तपासणी शिबिर अंतर्गत ५३ बीएमसी सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी केली तसेच मोफत औषधी वितरण केले. बुरशीजन्य संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य स्वच्छता पद्धती पाळण्याबद्दल समाजाला शिक्षित करणे हे या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट होते. शिबिरात बुरशीजन्य रोग ओळखण्या-बाबत जनजागृती करण्यात आली व वेळेवर उपचार करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. दि एस्थेटिक क्लिनिक्स च्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर, देबाब्रता ऑरो फाऊंडेशन चे संचालक डॉ. देबराज शोम यांच्या सहकार्याने दि एस्थेटिक क्लिनिक्स मार्फत डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले व यातूनच देबाब्रता ऑरो फाऊंडेशन टीम यांनी चांगले कार्य पार पाडले.
बुरशीजन्य संसर्ग हा त्वचा, नख आणि विविध अंतर्गत अवयवांमध्ये होऊ शकतो. अशावेळी अनेकदा खाज सुटणे, लालसरपणा येणे किंवा असामान्य स्त्राव यांसारखी लक्षणे दिसून येतात. तुम्हाला फंगल इन्फेक्शनचा संशय आल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कारण वेळीच निदान झाल्यास आणि उपचार घेतल्यास गंभीर आरोग्य समस्या टळू शकतात. अशा संसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास ते शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकते किंवा इन्फेक्शन होऊ शकते. याव्यतिरिक्त, मधुमेह किंवा एचआयव्हीसारख्या परिस्थितीमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्ती अनेकदा बुरशीजन्य संसर्गास बळी पडतात. अशा व्यक्तींनी त्वरित वैद्यकीय सेवा घेणे गरजेचे आहे. बुरशीजन्य संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी नियमित तपासणी आणि वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे.