विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्यावैश्विक वचनपूर्तीचा प्रारंभ

माईर्स एमआयटी या विश्वविख्यात शिक्षणसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी नुकताच इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशांचा दौरा केला. अमेरिकेतील उटाह राज्यातील ब्रिघॅम यंग युनिव्हर्सिटीच्यावतीने डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी डी.लिट. प्रदान करण्यात आली. मॅरिएट सेंटर ह्या प्रचंड मोठ्या सभागृहात २३ हजार विद्यार्थी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत डी.लिट. प्रदान सोहळा पार पडला. जवळजवळ २० लाख लोकांनी हा सोहळा ऑनलाईन बघितला. ही डी.लिट. पदवी स्वीकारण्यासाठी अमेरिकेला जाताना इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण हा विषय मध्यवर्ती ठेवून एक परिषद झाली. त्यात अनेक देशातील विद्वान मंडळी सहभागी झाली होती. ही परिषद म्हणजे या लेखाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या वैश्विक वचनपूर्तीचा प्रारंभच होता.
१९८३ साली एमआयटी स्थापन केल्यापासून केवळ शिक्षण एवढाच विचार न करता, समाजाचा सर्वांगीण उध्दार होण्यासाठी आणि मानवी जीवनात शांती निर्माण होण्यासाठी शिक्षण हे अत्यंत उपयुक्त माध्यम आहे असा विचार करून डॉ. कराड काम करू लागले. वारकरी परिवारात घेतलेला जन्म स्वाभाविकच, ‘जे जे भेटे भूत तयासि मानिजे भगवंत।’ हे कराड सरांच्या जन्मजात विचारांचा एक भाग होता. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील ‘आता विश्वात्मके देवे’ हा चरण शालेय जीवनापासून कराड सरांना विश्वशांतीच्या दिशेने नेत होता. कराड सरांना शिक्षणाविषयीची असलेले जन्मजात ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. पुणे शहरातील सीओईपी महाविद्यालयातून इंजिनिअर होऊन २० वर्षे प्राध्यापकी झाल्यावर स्वतःचे अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन केल्यानंतर शिक्षणासोबत समाजाच्या उध्दाराचा विचार विश्वनाथ कराड सरांनी आपल्या शिक्षणसंस्थेत अंतर्भूत केला.
विश्वधर्मी प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि अमेरिका ह्या दौर्‍यामागचा हेतू आणि पूर्वपीठिका वाचकांना कळावी म्हणून उपरोक्त उहापोह! वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण (व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टिम) ही काळाची गरज आहे. इतिहासामध्ये अनेक शांतीदूत होऊन गेले संपूर्ण पृथ्वीच्या स्थैर्यासाठी मानवी मनःशांतीची आवश्यकता भारतातच नव्हे तर जगभरात अनेक संतांनी मांडलेली आढळते. जगातील अनेक धर्म या अशा पध्दतीने मानवी जीवनाचा विचार मांडणार्‍या संतांना देवत्त्व देऊन गेले. याच क्रमवारीत विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड या आधुनिक ज्ञानी व संत प्रवृत्तीच्या शिक्षणतज्ञाची गणना करावी लागते. परंतु आतापर्यंत झालेले विश्वशांती दूत (मेसेंजर ऑफ पीस) आणि विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्यात एक मूलभूत फरक आहे. आजवर झालेल्या विश्वशांती उपासकांनी कधीही मानवी जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिक्षण या शब्दाकडे लक्ष दिले नाही.
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी गेले ३० वर्षे व्यक्तिगत उत्कर्षाचे शिक्षण देत असतानाच सामाजिक उत्कर्षाचा अभ्यासक्रमही आमलात आणावा लागेल असे मत सांगून स्वतःच्या शैक्षणिक संस्थेपासून या विचारांचा प्रारंभ केला. आधी केले मग सांगितले अशी भूमिका कराड सरांनी प्रत्यक्षात आमलात आणली.
भारतामध्ये हा विचार रुजवत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या लढाया, हिंसाचार अजूनही थांबले नाहीत. काही वेळा प्रश्न पडतो मग या आधी झालेल्या शांतीदूतांनी, महापुरुषांनी दिलेली शिकवण प्रत्यक्षामध्ये आचरणात आलीच नाही. काय मुद्दा, विचार, उणीव राहिली की भगवान महावीर, भगवान गौतम बुध्द, महात्मा गांधी, दलाई लामा सारख्या अनेक महामानवांनी शांतीचा पुरस्कार करूनही मानवाचे जगणे अजून अस्थिर आणि अशांत राहिलं? मला व्यक्तिशः असे वाटते की या सर्व महापुरुषांच्या महामानवांच्या विश्वशांतीच्या प्रबोधनामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा अंतर्भाव आढळत नाही. सामाजिक शिक्षणाच्या दिशेने जातांना मूल्याधिष्ठित शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हा महत्त्वाचा विभाग उपरोक्त महामानवांच्या सामाजिक कार्यात आढळला नाही विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षण हा विचार आज आवश्यक आहे आणि म्हणून डॉ. कराड सर यांचे कार्य वेगळं ठरत.
आता गरज आहे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या विश्वात्मक विचारांची जे विचार भारतीय शैक्षणिक अभ्यासक्रमातून जनमानसापर्यंत पोहचवावे लागतील आणि हे कार्य डॉ. विश्वनाथ कराड सर गेली ३० – ३५ वर्षे करत आहेत. याचा पुरावा याच लेखात वरती सांगितलेली विश्वशांती उद्घोष करणारी प्रार्थना! आणि म्हणून आक्सफर्ड विद्यापीठातील डॉ. विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्त्वाखाली झालेली वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण परिषद या लेखाच्या शीर्षकाला सिध्द करते.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात कराड सरांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या परिषदेमध्ये हा विषय अनेक देशांमधील विद्वानांसमोर कराड सरांनी मांडला. ज्यांनी अर्ध्या जगावर राज्य केले, त्यांच्या विद्यापीठांमध्ये भारतीय संस्कृतीतील हा वैश्विक विचार चर्चेला आला आणि विश्वनाथ कराड सरांच्या वैश्विक वचनपूर्तिचा प्रारंभ झाला असे माझे स्पष्ट मत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील परिषदेनंतर शिकागो येथील स्वामी विवेकानंदांनी १८९३ साली केलेल्या भाषणाच्या स्थानी डॉ. विश्वनाथ कराड यांनी उपस्थितांसमोर भाषण करताना विज्ञान आणि अध्यात्माचा संगम जगात विश्वशांती निर्माण करेल हा विचार प्रकर्षाने मांडला आणि त्यानंतर सॉल्टलेक सिटीमध्ये ब्रिघॅम यंग युनिव्हर्सिटी कराड सरांना दिलेल्या डी.लिट. या पदवीच्या पाठीमागे त्याविद्यापीठाने केलेला विचार हा विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या गेल्या ३५ वर्षातील विचारांची परिपूर्णता सिध्द करतो.
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या विचारांचा डॉ. विश्वनाथ कराड यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय विश्वात शांती निर्माण करेल हा स्वामी विवेकानंदांचा सिध्दांत प्रत्यक्षात जरी आला नाही तरी जगातील सगळ्यात मोठ्या शांती घुमटामध्ये डॉ. विश्वनाथ कराड यांनी संत, शास्त्रज्ञ आणि विविध धर्मांचे महापुरुष यांचे पुतळे एकत्र आणले आहेत. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर – जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज विश्वशांती घुमट, म्हणजेच अध्यात्मिक शास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा डॉ. विश्वनाथ कराड यांनी निर्माण केली. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली ते अल्बर्ट आईन्स्टाईन हा प्रवास जगात विश्वनाथ कराड यांनी प्रथमच मांडला. स्वामी विवेकानंदांच्या अध्यात्म आणि विज्ञान या संगमाचा हा शाश्वत सिध्दांत आहे.
विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मनामध्ये निर्माण झालेला हा विश्वशांतीसाठी आवश्यक असलेला, वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षणाचा विचार आणि त्या विचारातून विश्वनाथ कराड सरांनी स्वतःलाच दिलेलं वचन पूर्ण करण्याची प्रक्रीया डॉ. विश्वनाथ कराड यांच्या इंग्लंड आणि अमेरिका दौर्‍यांने जगासमोर मांडली आणि म्हणून विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वैश्विक वचनपूर्तीचा प्रारंभ अर्ध्या जगावर अनेक शतके राज्य करणार्‍या इंग्लंड या देशातून व्हावा हा ईश्वरीय संकेत आहे या बद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही.

  • डॉ. संजय उपाध्ये

Leave A Reply

Translate »