‘महाराष्ट्र केसरी’सह विजेत्या मल्लांना बक्षिसांचे वितरण

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण आज झाले. महाराष्ट्र केसरी मुख्य किताब विजेता, उपमहाराष्ट्र केसरी, १८ वजनी गटातील विजेते, सांघिक विजेते, उपविजेते यांना घोषित केलेल्या थार, टॅक्ट्ररसह जावा गाड्या व अन्य बक्षिसांचे वितरण झाले. कोथरुड येथील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये झालेल्या या समारंभात यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेला शिवराज राक्षे याला महिंद्रा थार गाडी व रोख पाच लाखाचे बक्षीस, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीस प्रायोजक व संयोजक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आले. प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना येजडी जावा गाडी व रोख बक्षीस देण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, शिरीष देशपांडे, प्रवीण बढेकर, विशाल गोखले, चंद्रकांत भरेकर, योगेश दोडके, संदीप भोंडवे, विलास कथुरे, भुजबळ परिवार यांच्यासह विजेते आणि वजनी गटांना जावा गाड्या दिलेले मान्यवर उपस्थित होते.

येजडी जावा गाडी गादी विभागात आतिष तोडकर (बीड, ५७ किलो), भारत पाटील (को. शहर, ६१ किलो), सोनबा गोंगाणे (को.जिल्हा, ६५ किलो), विनायक गुरव (को. शहर, ७० किलो), रविराज चव्हाण (सोलापूर जिल्हा, ७४ किलो), रोहीत अहिरे (नाशिक जिल्हा, ७९ किलो), प्रतिक जगताप (पुणे जिल्हा, ८६ किलो), कालिचरण सोलनकर (सोलापूर जिल्हा, ९२ किलो), ओंकार चौघुले (को.जिल्हा, ९७ किलो), शिवराज राक्षे (नांदेड, खुला वजन गट) यांना, तर माती विभागात सौरभ इगवे (सोलापूर शहर, ५७ किलो), ज्योतिबा अटकळे (सोलापूर जिल्हा, ६१ किलो), सुरज कोकाटे (पुणे जिल्हा, ६५ किलो), अनिल कचरे (पुणे जिल्हा, ७० किलो), श्रीकांत निकम (सांगली, ७४ किलो), विशाल कोकाटे (सातारा, ७९ किलो), अर्जुन काळे (भंडारा, ८६ किलो), बाबासाहेब तरंगे (पुणे जिल्हा, ९२ किलो), सारंग सोनटक्के (मुंबई उपनगर, ९७ किलो), महेंद्र गायकवाड (सोलापूर जिल्हा, खुला वजन गट) यांना गाडी व रोख बक्षिसे देण्यात आली.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पाच दिवस कुस्तीगीरांचा मेळा भरला व तो अत्यंत भव्यदिव्य आणि यशस्वीपणे पार पाडता आला, याचे समाधान आहे. महाराष्ट्र केसरीचे जनक स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांना यातून अभिवादन करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. स्पर्धा घेण्याचे जाहीर केल्यापासून ज्या गोष्टी, बक्षिसे आम्ही आश्वासित केली, त्याची पूर्तता आज झाली, याचाही आनंद आहे. विजयी मल्लांना केवळ भेटवस्तू न देता त्याची कायदेशीर व कागदोपत्री प्रक्रिया प्रादेशिक वाहन विभागाकडे पूर्ण केल्यानंतर ही वाहने विजेत्यांना सुपूर्त केली आहेत. प्रायोजक दात्याचे, माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो.”

Leave A Reply

Translate »