‘आरोग्यवारी’ पुणे ते बारामती १०० किलोमीटर रिले शर्यतीचे २४ जुलै रोजी आयोजन !

पुणे: बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशन तर्फे ‘आरोग्यवारी’ पुणे ते बारामती १०० किलोमीटर रिले शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रिले शर्यत रविवार, २४ जुुलै २०२२ रोजी होणार असून ४ गटामध्ये होणार्‍या या राज्यस्तरीय शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील सुमारे ७५० हून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती देताना बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आयर्नमॅन सतिश ननवरे, फाऊंडेशनचे ट्रस्टी राजू भिलारे, मार्गदर्शक व माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, संस्थेचे समीर ढोले, उद्योजक सुरेश परकाळे आणि कल्याण भेळचे संचालक आणि उद्योजक गिरीष कोंढारे यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त (२२ जुलै) या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीचे हे तिसरे वर्ष असून शतायुषी आरोग्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी याचे आयोजन केले गेले आहे. शर्यतीसह निरोगी आरोग्य राखण्याचा संदेश घेऊन अनेकजण या आरोग्यवारीमध्ये सहभागी होणार आहेत.

सतिश ननवरे यांनी या शर्यतीच्या आयोजनामागची संकल्पना स्पष्ट करताना म्हणाले की, ‘एक धाव अजितदादांसाठी’ ही या रिलेरन आरोग्यवारी मागील मध्यवर्ती संकल्पना असून, अजितदादांवरील प्रेमापोटी सर्वसामान्य बारामतीकर आणि बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सदस्य या आरोग्यवारीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. या आरोग्यवारीच्या माध्यमातून एकूण ६३,००० किमी सामूहिक रनिंग या निमित्ताने पूर्ण होणार आहे हे विशेष बाब असणार आहे. या विक्रमाची नोंद २०२२ सालच्या सर्वाधिक किमीच्या सार्वजनिक रिले रन या अंतर्गत इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये होणार आहे.

शर्यतीच्या स्वरूपाबाबत अधिक माहिती देताना सतिश ननवरे म्हणाले की, पुण्यातील सारसबाग येथून रविवारी पहाटे ४ वाजता रीले रॅलीची सुरूवात होणार असून संध्याकाळी ६ वाजता तीन हत्ती चौक बारामती येथे याचा समारोप होणार आहे. १० किलोमीटर, २१ कि.मी., ५० कि.मी. आणि १०० कि.मी. अशा चार वेगवेगळ्या गटांमध्ये हि शर्यत होणार आहे. सारसबाग ते गाडी तळ, हडपसर या १० किलोमीटरच्या टप्प्यामध्ये पुण्यातील अनेक धावपटूंनी सहभाग नोंदविला आहे.

सारसबाग ते दिवेघाट माथा २१ किलोमीटर हा शर्यतीचा दुसरा गट असणार आहेत. दिवेघाट माथा हा दुसरा थांबा असणार आहे. सासवड नगर परिषद – तिसरा थांबा, मल्हार गढ, जेजुरी- चौथा थांबा येथे ५० किलोमीटर पूर्ण केलेल्या धावपटूंचा अंतिम थांबा असणार आहे. मोरगाव बस स्थानक, मोरगाव- पाचवा थांबा, मुल शिक्षण संस्था, कर्‍हाटी- सहावा थांबा, कर्‍हावागज हा सातवा थांबा आणि तीन हत्ती चौक (भिगवण चौक), बारामती येथे शर्यतीचा अंतिम टप्पा पूर्ण होणार आहे.

अल्ट्रारनर व गिनिस बुक ऑफ रेकॉर्ड खेळाडू प्रिती म्हस्के हि ६४ किमी शर्यतीमध्ये भाग घेणार आहे. हॅपी फिट चॅमियनचे संस्थापक आणि मॅरथॉन धावपटू अमित कुमार हे १०० किमी शर्यतीमध्ये भाग घेणार आहेत.  तसेच लोकेश पाटील, राकेश कुमार, हेमंत पाटील, सुनिल अगरकर आणि तामली बासू हे ही १०० किमी शर्यतीमध्ये सहभागी होणार आहेत. औरंगाबादचे सचिन घोगरे, साताराचे विशाल घोरपडे, मुंबईतील ६ आणि पुण्यातून १९ धावपटू असे एकूण ३५ धावपटू १०० किमीच्या शर्यतीमध्ये भाग घेणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व धावपटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार असून प्रत्येक गटाच्या विजेत्या धावपटूंना करंडक, मेडल्स् आणि प्रमाणपत्र मिळणार आहे.

Leave A Reply

Translate »